वैजापूर, (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात रोटेगाव शिवारात १२ नोंव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला.
क्रीश रामा बनसोडे (२१) असे या अपघातातील मयत तरुणाचे नाव आहे. त्याची पत्नी शीतल क्रीश बनसोडे (२०) या गंभीर जखमी झाल्या. रोटेगाव येथील सहारा समृद्धी पार्क येथे ते राहतात. बनसोडे यांचे सासरे रेल्वेस्टेशन येथे आले होते.
-त्यांना घेण्यासाठी बनसोडे पती पत्नी दुचाकीवर (एमएच १७ बी. के. २७६२) जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एम एच २०सी एस ११६१) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात क्रीश यांचा जागेवर मृत्यू झाला. तर शीतल जखमी झाल्या. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचार सुरू आहेत.
क्रीश हे रेल्वेत पाणी विकण्याचे काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी आलोक बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार किसन गवळी करीत आहेत.














